Ad will apear here
Next
‘पथदर्शी’

विद्येविना मती गेली, 
मतीविना नीती गेली, 
नीतीविना गती गेली, 
गतीविना वित्त गेले, 
वित्ताविना शुद्र खचले, 
इतके अनर्थ एका अविद्येने केले... 

ही गोष्ट सर्वांत आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आली आणि त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील अज्ञान दूर करण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला. ज्योतिबांनी त्या प्रक्रियेचा ‘पाया रचला’ असं मी यासाठी म्हणालो, की ती प्रक्रिया इतक्या वर्षांनंतरही म्हणावी तशी पूर्ण झालेली नाही; पण बदल मात्र निश्चित दिसतोय. त्या काळच्या मागास मानल्या जाणाऱ्या अनेक जाती-जमातीतील समाज धुरिणांनी स्वतः शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवलं, जगाचा अनुभव घेतला, आणि या सर्वांचं महत्त्व लक्षात आल्यावर आपल्या समाजातील लोकांना विद्या, मती, नीती, गती, वित्त अशा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याच संदर्भाने एका समाजातील एक अभिनव आणि पथदर्शी अशी चळवळ आमच्या नजरेस पडली, ती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेखप्रपंच... 

मालवण तालुक्यातले चिंदर हे गाव, त्या गावच्या सड्यावर वसलेल्या सडेवाडीतील नाथपंथी गोसावी समाजाने सुरू केलेली ही चळवळ... सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजारांहून मोठ्या संख्येने नाथपंथी गोसावी समाज वेगवेगळ्या गावांमध्ये वास्तव्य करून आहे. त्यातल्या चिंदर सडेवाडीतील ही वस्ती, साधारण चाळीसेक घरांची. शिकली-सवरलेली काही मंडळी मुंबईसारख्या शहरात गेलेली आणि उरलेली आपली पारंपरिक शेतीभाती, किरकोळ कामधंदा सांभाळत गावात रमलेली. वाडीच्या नावातच सडा हा शब्द असल्याने ही वस्ती गावच्या पठारावर वसलेली आहे हे ओघाने आलेच. या समाजाकडे इनाम स्वरूपाने आलेली सामायिक मालकीची नऊ एकर जमीन होती; पण गेली पंचवीस वर्षे ती पडीक स्वरूपात होती. 

कधीही मेळ न बसणारा पावसाळी भातशेतीतील हिशेब आणि बागायतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य, ही दोन मोठी कारणे कदाचित या इतक्या वर्षाच्या ‘पड’ विषयाच्या मुळाशी असावीत. 

असो...
 
प्रत्येक चांगली गोष्ट घडण्यासाठी एक ‘ठरलेली’ वेळ यावी लागते आणि त्यासाठी काही तरी ‘निमित्त’ घडावं लागतं. सडेवाडीसाठी याची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली. याच वाडीतले मूळ रहिवासी, मुंबई निवासी असलेले संतोष गोसावी हे पेशाने स्थापत्य अभियंता. भगीरथ ग्रामविकास संस्थेच्या नवीन इमारतीचा आराखडा बनविण्याच्या निमित्ताने ते भगीरथ संस्थेशी जोडले गेले. ‘भगीरथ’ला अपेक्षित असलेले ग्रामविकासाचे काम आपल्या वाडीतही सुरू करावे या उद्देशाने डॉ. देवधर यांना घेऊन त्यांनी चिंदर सडेवाडीला भेट दिली. संतोष गोसावी, योगेश गोसावी, मंगेश गोसावी, पांडुरंग गोसावी आणि तिथली तरुण मंडळी डॉक्टरना उत्साही आणि काही तरी नवीन करण्याच्या मानसिकतेत असल्याचे लक्षात आले. साहजिकच डॉक्टरांनी अंग भरले आणि ‘भगीरथ’च्या मार्गदर्शनाला सुरुवात झाली. 

सडेवाडीच्या बाजूला एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगरावरून वाहत येणारे पाणी अडविण्यासाठी सत्तरच्या दशकात तिथल्या लोकांनी श्रमदानाने एक शेततळे खोदून त्याला बंधारा घातला होता; पण पाण्याच्या मोठ्या प्रवाहापुढे तो टिकला नाही. त्यानंतर अजून एकदा सरकारी प्रयत्न झाला, त्याचाही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षे सर्व स्तरावर केवळ चर्चा झडल्या; पण प्रयत्न मार्गी लागले नाहीत. त्यामुळे शेतीसाठी पाणी हा विषय फार दूर; पण या वाडीतल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा जानेवारीनंतर नेहमी तहानलेल्या असत. ‘भगीरथ’ने डोंगर उतारावर जेसीबीद्वारे समतल चर खोदणे आणि शेततळीची खोली वाढविण्याचा पर्याय दिला. सर्व ग्रामस्थ मंडळींनी यासाठी आर्थिक साह्य करत गेल्या वर्षी पावसापूर्वी हे काम पूर्ण केलं, उतरणाऱ्या पाण्याच्या वाटेतले चर आणि शेततळी यामुळे बरंच पाणी जिरवता आलं. या वर्षी त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आणि दर वर्षीपेक्षा एक महिना जास्त काळ पाणी टिकलं. अजून जास्त समतल चर खोदल्यास आणि शेततळी बांधल्यास पाणी जमिनीत मुरून यापेक्षाही पाण्याची पातळी वाढेल, असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला. 

जुने जाऊ द्या, मरणालागुनी, 
जाळुनी किंवा पुरुनी टाका, 
सडत न एक्या ठायी ठाका, 
सावध..! ऐका पुढल्या हाका, 
खांद्यास चला खांदा भिडवुनी.. 

या वर्षी अख्ख्या जगाला करोना आपत्तीला सामोरे जावे लागले. त्यातून आपल्याला बरंच काही शिकता आलं. सडेवाडीतील तरुण तरी याला अपवाद कसे असतील? येणाऱ्या काळात गावातच राहून शाश्वत असx काही तरी केलं पाहिजे आणि तेसुद्धा एकत्र येऊन... हे त्यांना मनोमन पटलं. भगीरथने मग पुढचा धडा शिकवायला घेतला. पड असलेल्या सामायिक मालकीच्या त्या नऊ एकर जमिनीत काजू लागवड करण्याचे निश्चित झाले. वाडीतल्या जुन्या जाणत्यांना त्यासाठी विश्वासात घेतलं गेलं. ग्रामस्थ मंडळींनी आपल्या ५१ हजार रुपयांच्या योगदानातून त्या जमिनीची साफसफाई करून घेतली. ‘नरेगा’च्या माध्यमातून १००० काजू कलमे उपलब्ध करण्यात आली आणि शास्त्रशुद्ध लागवड सुरू झाली. खरं तर लॉकडाउनमुळे काजू लागवडीला थोडा उशीर झाला, परंतु या तरुणांनी मधला हा वेळ वाया न घालवता २.५ एकर क्षेत्रात सामूहिक भात लागवड केली आहे. श्रावणातल्या 

क्षणात येते सरसर शिरवे.. 
क्षणात फिरुनी ऊन पडे.. 

या कवितेचा आनंद घेत हे हिरवगार शेत सध्या वाऱ्याच्या तालावर मस्त डोलतंय... 

या नाथपंथीय गोसावी संप्रदायाचे ‘गोरक्षनाथ’ हे गोवरातून अवतरले असे म्हटले जाते. खरं तर हे म्हणणं सांकेतिक असावं. दुर्लक्षित गोष्टीकडे सकारात्मक भावनेने पाहणं यातून अपेक्षित असावं. पूर्व परंपरेनुसार भिक्षा मागणे हा गोसावी समाजाचा धर्म होता, आता संदर्भ बदलले. आता पोटासाठी भिक्षा मागावी लागत नाही; पण काही ठिकाणी केवळ प्रथा-परंपरा म्हणून नवरात्रीत भिक्षुकी केली जाते. 

या नाथपंथीय गोसावी समाजाचे कुलदैवत आहे ‘सिद्ध महापुरुष.’ या नावातूनही बरंच काही लक्षात येतं. सडेवाडीतील समाज बांधवांनी एकत्र येऊन प्रथम या ‘श्री सिद्ध महापुरुषाचा’ मठ उभारला आणि त्याचा आशीर्वाद घेऊन या ‘विकास मंदिराची’ पायाभरणी केली, या अभिनव अशा चळवळीचा श्रीगणेशा केला. मला वाटतं, अशा विकास प्रक्रियेपासून दूर असलेल्या अनेक जातीधर्माच्या समाजधुरिणांनी हा आदर्श घेतला, तर मात्र मोठे परिवर्तन शक्य होईल यात तिळमात्र शंका नाही. 

आमची आजी सांगायची ‘ताक घुसळताना, लोणी येतंय की नाही हे बघण्यासाठी मध्ये मध्ये थांबून पाहिले पाहिजे’... 

सामाजिक अभिसरणामध्ये आपण नेमकी हीच गोष्ट विसरतो, त्यामुळे मग सणांचे नुसते उत्सव होतात. समाज हा ‘दिशादर्शक’ फलकासारखा आहे. तो तिथेच राहतो; पण सडेवाडीतला गोसावी समाज हा खऱ्या अर्थाने ‘पथदर्शी’ ठरला. 

त्यांच्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा... 

- प्रभाकर सावंत
संपर्क : ९४२२३ ७३८५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IXKZCP
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’ शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग
मुडी...! बियाण्यासाठीचं धान्य साठवण्याच्या घरगुती मुड्या आज कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. ‘मुडी’विषयी बाबू घाडीगावकर यांनी केलेलं हे स्मरणरंजन...
पारंपरिक भात वाणांचे जतन आणि संवर्धन : सिंधुदुर्गातील प्रयोग शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language